चिमुकली मुलं घरात असताना आईची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पती दुध आणण्यासाठी गेल्यानंतर घरात दोन चिमुकली मुलं असताना विवाहितेने घरातील सीलींगला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ही घटना सीबीडी बेलापूर येथील सेक्टर -२ मध्ये धुळवडी दिवशी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. आशा कुमावत (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा कुमावत या सीबीडी बेलापूर येथे सेक्टर – २ मध्ये राहण्यास आहेत. त्यांना ३ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती रामस्वरुप कुमावत हे रात्री सव्वा दहाच्या सुमारास दुध आणण्यासाठी दुकानात गेले होते. त्यावेळी मुलं मोबाईलवर खेळत होती. दुध घेऊन परतल्यानंतर आशा यांनी आपल्या घरातील देवघरात सीलींगला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तिला लटकलेले पाहून कात्रीने ओढणी कापून शेजाऱ्यांच्या मदतीने खाली उतरवले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आशा यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पोलीसही तेथे दाखल झाले. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली. घरात सुसाईड नोटही सापडली नाही.