औरंगाबादमध्ये उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन – रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ नामांतर शहीद स्मारकास होत असलेली दिरंगाई, परीक्षेचा घोळ, शिक्षण परीक्षा शुल्क 50 टक्के माफ करण्याची मागणी करीत औरंगाबाद येथे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बसून मंत्री सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या विरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी संघटनांनी औरंगाबादेत तर जळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी मागील महिन्यातही धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणही करण्यात आली होती. याच संदर्भाच्या अनुषंगाने मंत्री सामंत यांनी मंत्र्यांचा ताफा अडवणे, वाहनापुढे येणे, लाठया-काठया घेऊन पुढे येणे, अशी हिंमत कुठून येते, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत आपल्याबाबत घडलेल्या प्रसंगांची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.