आक्षेपार्ह उल्लेखानंतर खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या – ‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. हे पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्विट करत ही बाब निदर्शनास आणून दिली. दरम्यान, खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याबद्दल भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्यानंतर रक्षा खडसे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा आपणास बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख आल्यानंतर काही वेळानंतर तो काढून टाकण्यात आला. तसेच चूक दुरुस्त करण्यात आली. (derogatory description of BJP MP Raksha Khadse) यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्याचा इशारा दिला.

यावर अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ”भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. @BJP4India आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा @MahaCyber1 पुढील कारवाई करेल.” दरम्यान, त्यांनी खडसे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना टॅग केले आहे. भाजपची वेबसाइट कोण चालवतं आहेत? असे ट्विट चतुर्वेदी यांनी केलं.