प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवर्‍याच्या हत्येचा कट, तरूणीसह तिघे ‘गोत्यात’; महाराष्ट्रातील घटना

यवतमाळः पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या चार दिवसावर लग्न येऊन ठेपले असताना तरुणीने प्रियकराच्या मदतीने भावी नवऱ्याला शितपेयातून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे ही घटना घडली आहे. या घटनेची कबुली खुद्द भावी पत्नीनेच दिली आहे. त्यानुसार तरुणीसह तिघांना अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहळा (ता. नेर) येथील किशोर परशराम राठोड या तरुणाचे लग्न जांभुळणी गावातील एका तरुणीशी ठरले होते. त्यांचे लग्न 19 एप्रिलला होणार होते. मात्र, तरुणीचे एका तरुणासोबत प्रेम संबंध असल्याने तिला त्याच्यासोबतच लग्न करायचे होते. मात्र, कुटुंबाच्या शब्दाबाहेर जाता येत नाही, म्हणून तिने किशोर सोबतच्या लग्नाला नकार दिला नाही. परंतु, यातून मार्ग काढत लग्न मोडले पाहिजे यासाठी त्यांनी शक्कल लढवली. यासाठी तरुणी आणि प्रियकराने एक बेत आखला. किशोरला खरेदीच्या बहाण्याने नेर येथे बोलावले होते. त्यावेळी तरुणी दोन भाऊ आणि बहिणीसोबत नेरमध्ये आली. त्यानंतर तिने किशोरला ज्यूस सेंटरमध्ये घेऊन गेली. ठरल्याप्रमाणे त्याला शीतपेय पिण्याचा आग्रह केला. त्याने देखील होणा-या बायकोच्या आग्रहाखातर शीतपेय पिले. त्यानंतर तरुणी आपल्या बहीण-भावासह निघून गेली. किशोर देखील तिथून निघून गेला. मात्र थोड्या वेळाने त्याला मळमळ होत असल्याने तो खाली पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने किशोर त्यातून बरा झाला त्यानंतर त्याने सर्व प्रकार पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी कारवाई करत तरुणी आणि तिच्या दोन भावांना अटक केली आहे. त्यावेळी या विष प्रयोगाचा भांडाफोड झाला आहे.