कोल्हापूरमधील सीपीआरमध्ये विद्यार्थिनीवर बळजबरीचा प्रयत्न, पिडीतेवर उपचार सुरू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नर्सिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सीपीआरच्या पुरुष परिचारकाने जबदरस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाच्या ओटी विभागात घडला. या घटनेने सीपीआरमध्ये एकच खळबळ उडाली असून, संबंधित परिचारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थिनीने सदर घटनेची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यावर ते तात्काळ सोलापुरातून – कोल्हापुरात आले. त्यांनी घडलेली संपूर्ण घटना सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. मोरे आणि परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगितली. दरम्यान, घटना घडली तेव्हा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी संशयिताला चोप दिला. घटनेनंतर पीडितेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला उपचारासाठी सीपीआर येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी सीपीआर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत बोलताना सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. मोरे म्हणाले, सीपीआर मध्ये घडलेली घटना ही गंभीर स्वरुपाची आहे. अशा गोष्टी येथे खपवून घेतल्या जाणार नाही. संबंधितावर कारवाई करण्यात येईल.