Pune : पसार झालेला सराईत चोरटयाचा आत्महत्येचा प्रयत्न, दुचाकी घसरल्याने लागला पोलीसाच्या हाती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या तावडीतून तो निसटला. मात्र थोड्या अंतरावर जाताच चोरट्याची दुचाकी घसरल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. दरम्यान त्याने आपल्याला पकडून नये, म्हणून ब्लेड आणि चाकूने स्वत:वर शस्त्रांनी वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

बबलूसिंग प्रभूसिंग टाक (वय 30) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या चोरट्याचे नाव आहे. जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोणी काळभोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलूसिंग टाक याच्या विरोधात घरफोडी, लूटमार असे गुन्हे दाखल आहेत. तो ऊरळी देवाची परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे 5 च्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी घराजवळ सापळा रचला होता. पोलीस आल्याची कुणकुण लागताच टाक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. दुचाकीवरून पसार झालेल्या टाकला पकडण्यासाठी पोलिसांनी पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याची दुचाकी घसरली. टाकने त्याच्याकडील चाकू तसेच ब्लेडने स्वत:वर वार केले. जखमी टाकला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.