वेतन न मिळाल्यानं शिक्षकाचा आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  एका शिक्षकाकडून आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमक पथक दाखल झाले आहे. गजानन खैरे असे आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. वेतन मिळत नसल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे .

घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत दाखल झाले असून ते त्या शिक्षकाची समजूत काढत आहेत. त्यांना लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलं आहे. मात्र आताच अध्यादेश काढा अशी त्या शिक्षकाची अट आहे आणि तो त्याच्या मागणीवर ठाम आहे. आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

गजानन खैरे हे मूळचे औरंगाबादचे आहेत. विनाअनुदानीत शाळांना अनुदान मिळावे यासाठी त्यांनी नाशिक ते विधानभवन असा पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न देखील केला होता. तेव्हा त्यांना थांबवण्यात आले यांनी यावर उपसमिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. याचा पाठपुरावा करण्यासाठी ते गेले काही दिवस आमदार निवासात होते. आज अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.