दोन शाळकरी मुलींचा विहीरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, एकीचा मृत्यू

साखरखेर्डा (बुलढाणा) : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील एका शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला तर एकीला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

ही घटना आज (सोमवार) सायंकाळी चारच्या सुमारास शेंदुर्जन येथे घडली. जखमी मुलीवर साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारकरुन पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून मुलींनी हे टोकाचे पाऊल का उचचले हे अद्याप समजू शकले नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलींसोबत आणखी एक मुलगी होती. मात्र, ऐनवेळी तीने विचार बदलल्याने ती घरी निघून गेली.

साखरखेर्डा येथील एका हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात या मुली शिक्षण घेत होत्या. दरम्यान, या तिन्ही मुली आज शाळेतून गायब होत्या. दुपारची सुटी झाल्यानंतर त्या माध्यान्ही घरी आल्या नाहीत. शाळेतील काही मुलींनी दुपारी शिक्षकांना याची कल्पना दिली. तिघीही शाळेत आल्या होत्या. परंतू वर्गात न येताच त्या निघून गेल्या असल्याची माहिती ही देण्यात आली.

त्यांच्यासोबत शाळेतीलच दोन मुलेही गायब असल्याची माहिती समोर आली होती. ही बाब पाहता शाळेतील शिक्षक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले असता तिघींपैकी एक मुलगी ही घरी परतल्याचे समजले तर दोघी काळीपिवळीत बसून शेंदूर्जनच्या दिशेने गेल्याची माहिती शिक्षकांना मिळाली. प्रकरणी शाळेचे प्राचार्य संतोष दसरे यांनी पालकांना याची माहिती देऊन शेंदुर्जनच्या दिशेने शिक्षक दोन्ही मुलींच्या शोधात गेले.

दरम्यान, चार वाजेच्या सुमारास दोन मुलींनी उत्तम शिंगणे यांच्या विहीरीत उडी मारल्याचे काही महिलांनी पाहिले. त्यांच्या शाळेच्या गणवेशावरून या मुली साखरखेर्डा येथील असल्याचे स्पष्ट होत होते. विहीरीत उडी घेणाऱ्या दोन्ही मुलींपैकी एकीने कसाबसा आपला जीव वाचवत विहीरीचा काठ गाठल्याने ती वाचली. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढत साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर डॉ. संदीप सुरुशे यांनी प्रथमोपचार करून तिला बुलडाणा येथे उपचारासाठी हलविले.

दरम्यान, शिक्षक, पोलीस आणि ग्रामस्थांनी दुसऱ्या मुलीचा विहीरीत शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळून आली. सायंकाळी सहाच्या सुमारास तिचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला. स्नेहा गवई असे या मृत मुलीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.