पूंछमध्ये हल्ल्याचा प्रयत्न उधळला, PAK अतिरेक्यांच्या 2 साथीदारांना अटक

जम्मू : वृत्तसंस्था – सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून अतिरेकी कारवाया सुरुच आहेत. अतिरेकी सीमावर्ती पूंछ जिल्ह्यातील एका मंदिरात हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावत पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तीन साथीदारांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून सहा बॉम्ब जप्त केले.

पूंछचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रमेश कुमार अंग्राल यांनी सांगितले की, पाकिस्तानी हस्तकांच्या आदेशानुसार मंदिरात हल्ला करुन पूंछ जिल्ह्यातील शांतता बिघडवण्याचा त्यांचा डाव होता. स्थानिक पोलिसांच्या विशेष कार्य गटाने आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्त कारवाई करुन तिघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. या कारवाईत मुस्तफा इक्बाल खान आणि मुर्तूझा इक्बाल या दोन भावांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मंदिरात हल्ला करण्याचा कट होता अशी माहिती दिली. 49 राष्ट्रीय रायफल्सच्या बसुनीस्थित मुख्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली होती.

मुस्तफाला पाकिस्तानातून आलेल्या फोनवर बॉम्बहल्ला करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच्या फोनमध्ये बॉम्बफेक कशी करायची, याचा व्हिडीओ आढळला आहे. त्याच्या अतिरेकी कारवायांत सहभाग असल्याचेही आढळले आहे. त्याच्या कबुली वरून त्याचे दोन साथीदार मोहम्मद यासिन आणि रईस अहमद या दोघांनाही पकडण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले.

सहा बॉम्ब जप्त

अटक करण्यात आलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. मुस्तफाच्या घरावर छापा टाकून सहा बॉम्ब जप्त केले आहे. पाकिस्तानी निशाणी असलेले काही फुगे आणि जे अँड के फोर्स या संघटनेची काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. हल्ले करण्याचे निर्देश देणाऱ्यांशी ते संपर्कात होते.