आंदोलनकर्त्या खासदारांच्या मध्यस्थीचा उपसभापतींचा प्रयत्न अपयशी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यसभेत गैरवर्तन केल्यामुळे निलंबित केल्याच्या निषेर्धात आठ खासदारांनी संसदेच्या आवारात रात्रभर धरणे आंदोलन केले. त्यांची समजूत काढण्याचा उपसभापती हरिवंश यांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. हरिवंश काल सकाळी या सदस्यांसाठी स्वत: चहा घेऊन गेले होते. मात्र, विरोधी सदस्यांनी त्यांचा चहा आणि मध्यस्थी दोन्ही मान्य केले नाही.

पाहुणचार घेण्यास नकार दिल्यामुळे व्यथित झालेल्या उपसभापतींनी आज सकाळपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा केली. हरिवंश यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना भावनिक पत्र लिहिले. राज्यसभेत रविवारी झालेल्या घटनांमुळे व्यथित झालो आहे. लोकशाहीच्या नावाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेले कृत्य हिंसक होते. सभापतीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला भयभीत करण्याचा प्रयत्न केला गेला, असे या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, निलंबित सदस्यांसाठी चहा घेऊन जाण्याच्या हरिवंश यांच्या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ज्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि काही दिवसांपूर्वी त्यांचा अपमान केला त्यांच्यासाठी हरिवंश स्वत: चहा घेऊन गेले. हरिवंश यांची विनम्रता दिसल्याचे त्यांनी म्हटले आहे.