CM उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ मताशी ‘मनसे’ सहमत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेगवेगळ्या मुद्यांवरुन राज्यातील ठाकरे सरकारवर टीका करणारी मनसे बॉलिवूडच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत झाली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बॉलिवूडच्या संदर्भात अलीकडेच केलेल्या एका वक्तव्याचं त्यांनी एक प्रकारे समर्थन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यातील मल्टिप्लेक्स व थिएटर मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी बॉलिवडच्या विरोधातील कारस्थानाच उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मागील काही दिवसांपासून ठराविक लोकांकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. मनसेचे खोपकर यांनी देखील त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

काय म्हणाले खोपकर ?
भूतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली. त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवण्याचे कुटील कारस्थान रचलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थान कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारापर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे, असे अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.