वाईन शॉप व्यावसायिकाला पिस्तुलच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाईन शॉपमध्ये जमा झालेली साडेतीन लाखांची रोकड घेऊन घराकडे जाणाऱ्या वाईन शॉप मालकाचा पाठलाग करून लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी वाईन शॉप मालकाला पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या कामगारांनी चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव फसला.

कामगारांनी एका चोरट्याल पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले. हा प्रकार बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड येथील अशोक टॉकीजजवळ घडला.

संदीप श्रीपती ढवले (वय 33, रा. मु.पो. हुंडारे वस्ती, पिंपरी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार किरण जाधव आणि अन्य एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेला. विशाल घनश्‍याम सोमानी (वय 40, रा. कोकणे चौकाजवळ, रहाटणी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाणी यांचे चाकण येथे वाईन शॉप असून बुधवारी रात्री दुकान बंद करून दिवसभरात जमा झालेली रक्कम घेऊन ते घरी जात होते. दुकानातून दुचाकीवरून घरी जात असताना तीन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. चोरट्यांनी चाकणपासून त्यांच्या मागावर होते. ते चिंचवड येथील अशोक टॉकीजजवळ आले असता चोरट्यांनी त्यांना अडवून पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याच प्रयत्न केला. त्याचवेळी सोमानी यांच्या सोबत असलेल्या कामगारांनी आरोपी संदीप ढवले याला पकडून ठेवले तर त्याचे दोन साथीदार फरार झाले. पुढील तपास उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करीत आहेत.

Loading...
You might also like