मराठवाडयातील खळबळजनक प्रकार ! चक्क गर्भातील बाळ ‘ऑनलाईन’ विकायला काढलं

पोलीसनामा ऑनलाइन –  ऑनलाईनच्या जमान्यात सर्वकाही घरबसल्या मिळत आहे. अशातच औरंगाबादमध्ये काही नराधमांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर माणुसकीच विकायला काढली आहे. गर्भातील बाळ ऑनलाइन विकायला काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेहुनीच्या पोटातील मुल जन्मायच्या आधीच दत्तक घेण्याच्या नावाखाली चार लाख रुपयांना विकायला काढल्याचा प्रकार सायबरसेलने उघडकीस आणला आहे.

या प्रकरणी निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी फेसबुकवर संदेश पाठवला होता. शिवशंकरने त्याच्या संदेशात मेहुणी सात महिन्यांची गरोदर असून तिला तिच्या नवर्‍याने सोडले आहे. तिचे दुसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे मेहुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते विक्री करायचे आहे. त्याबदल्यात पैशांचीही त्याने मागणी केली होती. त्यांनी पीपल अ‍ॅडॉप्शन ग्रुपमधून दत्तक मूल घेऊ इच्छिणार्‍यांची यादी देखील मिळवली होती. तसेच त्यातील काहींशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करून आर्थिक व्यवहाराची चर्चाही केली होती. जन्माला येणार्‍या बाळाची चार लाखांपर्यंतची किंमत सांगण्यात आली होती. ही बाब महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत क्रांतिचौक पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर शिवशंकर तांगडे याचा पत्ता सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी व त्यांच्या पथकाने शोधला. तांगडे हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असून सध्या तो औरंगाबादजवळील रांजणगावातील शेणपुंजी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.