परदेशातून लष्कराची हेरगिरी करण्याचा प्रयत्न, मुंबईतील बेकायदा टेलिफोन एक्सचेंज उद्धवस्त

 जम्मू आणि काश्मीरच्या मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरुन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोवंडीत कारवाई करुन बेकायदा टेलिफोन एक्सचेंज उद्धवस्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सिम बॉक्स कार्यप्रणालीद्वारे संमातर टेलिफॉम एक्सचेंज चालवून आंतरराष्ट्रीय कॉल्स अनाधिकृतपणे भारतात राऊट करुन भारत सरकार तसेच मोबाईल कंपन्यांची आर्थिक फसवणुक करणार्‍याचा प्रयत्न सुरु होता. इतकेच नाही तर त्याद्वारे देशविरोधी कारवाया घडवून आणण्यासाठी या अनाधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

समीर केदार अलवारी (वय ३८, रा. शिवाजीनगर, गोवंडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अलवारीकडून ५ सिमबॉक्सचे सेटअप सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. लेह, लडाख येथील लष्करी तळ, काश्मीर येथील राजोरी, पुंछ, या परिसरातील लष्करी तळांवर गेल्या काही दिवसांपासून गोवंडी येथील या समातंर टेलिफोन एक्सचेंजमधून फोन जात होते. दूरध्वनी करणारी व्यक्ती लष्करातील अंतर्गत माहिती विचारत होती. तसेच किती जवानांना कोरोना ची लागण झाली आहे, याची चौकशी केली जात होती. जम्मू काश्मीरच्या मिलिटरी इंटेलिन्सकडून मुंबई पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.

सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण, अर्पणा जोशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील दोन मोबाईल क्रमांक हे प्रिपेड असून मध्य प्रदेश व छत्तीसगड या सर्कलचे अ‍ॅक्टीवेशन आहे. दोन्ही मोबाईल क्रमांकाचे कॉल पॅटर्न तपासल्यावर सर्वाधिक आऊट गोईग कॉल व इनकमिग मेसेज आढळून आले. दोन्ही मोबाईल क्रमांकाचे कॉलपॅटर्ननुसार गोवंडी या परिसरात अनधिकृतपणे संमातर टेलिकॉम आपरेशन चालवून भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय कॉल सिम बॉक्सच्या मार्फत अवैद्यरित्या मुंबई व भारतातील इतर ठिकाणी जनरेट करुन एअरटेल व इतर मोबाईल कंपन्यांचे व भारत सरकारचे आर्थिक नुकसान करत असल्याचे आढळून आले. याची खात्री झाल्यावर पोलिसांनी दोन पथके तयार करुन गोवंडीतील नटवर पारेख कम्पाऊंड येथे छापा टाकला. तेथे समीश अलवारी याच्या घरात ३ कप्याच्या लाकडी बॉक्समध्ये ५ सिमबॉक्स चे सेटअप तयार करुन संमातर टेलिकॉम ऑपरेशन चालवित असल्याचे दिसून आले. त्याकडून २२३ सीम कार्ड ही जप्त करण्यात आले आहेत. समीर अलवारी याच्यासह त्यांच्या इतर ५ साथीदारांविरुद्ध यापूर्वी भोईवाडा पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे समांतर टेलिफोन एक्सचेंज चालविल्याचा गुन्हा २०१७ मध्ये दाखल करण्यात आला होता.