350 मुंबईकरांमागे केवळ एक पोलीस ! मंजूर पदांपैकी 19 ते 20 % पदे अद्याप रिक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मायानगरी म्हणजेच मुंबई ही नेहमी अतिरेक्यांच्या टार्गेटवर असते, अशा या मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी काही मोजक्याच मुंबई पोलिसांच्या खांद्यावर आहे. सध्याचे चित्र साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे आहे. मंजूर झालेल्या पदांपैकी 19 ते 20 टक्के पदे अद्याप रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदांमधील फरक जवळपास 41 टक्के इतका आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी आहे. मात्र इतकी लोकसंख्या असूनही अवघ्या 40 हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत कार्यरत आहे. एका खासगी संस्थेच्या रिपोर्टनुसार 2018 साली मुंबई पोलीस दलात एकूण 50 हजार 606 पदे मंजूर होती. या पदांपैकी 39 हजार 561 जण हे कार्यरत होते. म्हणजेच यामध्ये 22 टक्क्यांची मोठी तफावत होती. तसेच 2019 मध्ये मुंबईमध्ये 50 हजार 488 मंजूर पदांपैकी 41 हजार 115 जण कार्यरत होते. विशेष म्हणजे या कार्यरत असणाऱ्या पोलिसांपैकी सर्वाधिक मनुष्यबळ हे बंदोबस्तासाठीच अडकलेले असते.

दरम्यान टेक्निकल पोस्टकडे अधिक दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र दिसते. कारण 5 हजार पदे मंजूर असूनही सध्या केवळ 2 हजार 844 पोलिसांवर काम चालू आहे. या रिक्त पदांचा फटका गुन्ह्यांचा तपासावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दरम्यान पोलिसांवर कामाचा ताण अधिकच वाढत चालला आहे, कारण संख्या कमी असल्याने अतिरिक्त भार सोसावा लागतो. त्यामुळे आता राज्यभरात होणाऱ्या मेगा पोलीस भरतीतून का होईना थोड्याफार प्रमाणात ही तफावत कमी होईल अशी अशा पोलिसांना लागून आहे.

अशी आहेत रिक्त पदे :
16% पोलीस निरीक्षक, 41% सहायक पोलीस निरीक्षक, 28% पोलीस उपनिरीक्षक, 29% सहायक पोलीस उपनिरीक्षक

कोरोनाचा सर्वाधिक फटका पोलिसांना
दरम्यान कोरोनाच्या या जीवघेण्या काळात पोलिसांना सर्वात जास्त फटका बसला आहे. राज्यभरात कार्यरत असणाऱ्या जवळपास 20 हजार पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी 208 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. यात जवळपास साडेतीन हजार पोलीस हे मुंबईतील होते आणि 60 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

You might also like