अक्षयतृतीयानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आंब्याची आकर्षक ‘आरास’ !

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अक्षय तृतीयानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी आंब्याची आरास केली आहे.

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या तिथीवर केलेले कोणत्याही कार्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणून ती अक्षय मानली जाते. या दिवसांपासून अनेक घरांमध्ये आंब्याचे सेवन करण्यास सुरुवात होते. आंब्याचे दिवस असल्याने त्यातून देवाला अक्षय दान म्हणून आंबा दान करण्यात येतो. विविध सणाच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट करण्यात येते. अक्षयतृतीयानिमित्त आज आंब्यांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी आंब्यांबरोबरच अननस, टरबुज, मोसंबी, पेरु, कलिंगड अशा फळांचा वापर करण्यात आला आहे.

अक्षयतृतीयाला धार्मिक महत्व खूप आहे. याचदिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. याचदिवशाी श्री विष्णुंचा सहावा अवतार श्री परशुराम यांचा जन्म झाला. याचदिवशी व्यास मुनींनी महाभारताच्या लिखाणास आरंभ केला व त्यांना श्री गणेशांनी लेखनीक म्हणून मदत केली.

अक्षयतृतीयाच्या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातात. याच दिवशी महात्मा बसेश्वर यांची जयंती असते. उन्हाचा दाह वाढत जात असल्याने या दिवसांपासून देवाला चंदनउटी लावण्यास सुरुवात होते.

अक्षयतृतीयेच्या दिवशी देवदेवतांना थंड पाण्याने स्रान घालून देवांना चंदनउटी लावली जाते. पुरणपोळी, आमरस, आंब्याची डाळ, कैरी पन्हे यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या दिवशी जप, तप, दान, विवाह, गृहप्रवेश, सोने, चांदी खरेदी करावी असे सांगितले जाते.