भाजप आमदाराची CM ठाकरेंकडे मागणी, म्हणाले – ‘BMC तर्फे लस खरेदी करून मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस द्या’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रासह मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरिता विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व जलद लसीकरणाची गरज आहे. मुंबई महापालिकेकडे 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून पालिकेची आर्थिक स्थितीही सक्षम आहे. त्यामुळे बीएमसीमार्फत लस खरेदी करून मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी व चौथी लाट येणार असून रुग्णसंख्या अधिक वाढण्याची भीती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही लस खरेदी करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

याबाबत आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत 18 ते 44 वयोगटातील सुमारे 58 लाख 50 हजार लोकसंख्या असून त्यांच्यासाठी लागणारी लस विकत घेण्यासाठी सुमारे 352 कोटीं रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून 45 वर्षे वयापेक्षा वरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करावे. या लसीकरणासाठी येणारा इतर खर्च व व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येऊन मदत करतील. तसेच, ज्या नागरिकांकडे मुंबई महापालिका क्षेत्रातील आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा असेल अशा व्यक्तींचे यातून प्राधान्याने लसीकरण केल्यास पुढील काही महिन्यात हे लसीकरण पूर्ण होऊन मुंबई कोरोनामुक्त करता येईल, असे भातखळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.