डीएसके विश्वमधील मालमत्तेचा लिलाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक आॅफ महाराष्ट्रचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकवले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने धायरीच्या डीएसके विश्वमधील गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता विक्रीस काढली आहे. तशी जाहिरात बँकेच्या वतीने आज वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकेने या जागेचा १ जून २०१८ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

लिलावात बोली लावण्यासाठी ८६ लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे. २१ जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार आहेत. २३ जुलैला डीएसके प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके आणि पत्नी हेमंती हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर त्यांचा पुुत्र शिरीष कुलकर्णी याचा सोमवारी अटकपूर्व अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला आहे़ गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल २ हजार ४३ कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर काही दिवसांपूर्वीच ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.