एकनाथ खडसेंच्या संभाव्य पक्षांतराची ऑडिओ क्लीप व्हायरल, भाजपाला लवकरच देणार सोडचिठ्ठी ?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे ज्येष्ठ आणि नाराज असलेले नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यांच्या या पक्षांतरासंदर्भात एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर वायरल होत असून यामध्ये खडसे हे महिनाभरात पक्ष सोडणार असून दुसर्‍या पक्षात काय पद मिळते, केवळ याचीच प्रतिक्षा आहेत, अशाप्रकारचा संवाद क्लीपमध्ये आहे. ऑडिया क्लीपनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र, क्लीपधील संवादात वरणगाव येथील जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी आता संपर्क होत नसल्याचे समजते.

जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. याप्रकरणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील अन्य नेत्यांनी आपल्याविरूद्ध कट कारस्थान रचल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यानंतरही मागीली काही वर्षात खडसे यांनी अनेकदा पक्षातील प्रमुख नेत्यांकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे जाहीर आरोप केले आहेत. तसेच ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा यापूर्वी अनेकदा रंगल्या आहेत. मात्र, यावेळे ही ऑडिओ क्लीप समोर आल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याच्या वृत्ताला अनेकांनी गांभिर्याने घेतले आहे.

खडसे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांनी उमेदवारी नाकारली होती. आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सुद्धा त्यांना घेतलेले नाही. यामुळे खडसे यांची नाराजी वाढली आहे. शिवाय कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी सातत्याने दबाव वाढत आहे. कार्यकर्ते त्यांना फोन करून आपले मनोगत मांडत आहेत.

असाच एक भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील कार्यकर्ता रोशन भंगाळे याने एकनाथ खडसे यांना फोन करून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. या चर्चेची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

ऑडिओ क्लीपमध्ये असा आहे संवाद…

रविंद्र भंगाळे : भाऊ आता राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आल्याने पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या.

एकनाथ खडसे : हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन नुसतेच कशाला बसायचे. काहीतरी पद मिळाले पाहिजे की नाही. महिनाभरात निर्णय घेऊ.

खडसे यांनी दिले सष्टीकरण
ही ऑडिओ क्लीप सर्वत्र वायरल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, तो कॉल चुकीचा असून अशा गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दिवसभर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते फोन करतात, भाऊ भूमिका घ्या, असं म्हणत आग्रह धरतात, असे खडसे म्हणाले.

खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेला अशी झाली सुरूवात
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बैठक घेतली होती. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा एक मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली, हा मोठा नेता म्हणजे खडसेच, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर स्थानिक राजकारणावर कोणता परिणाम होऊ शकतो, याची चाचपणी पवार यांनी या बैठकीत केल्याचे सांगितले गेले. मात्र, नंतर खडसे यांनीच यामध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते.