Aurangabad News : MBBS च्या विद्यार्थ्यानं आत्महत्या करून संपवलं जीवन

औरंगाबाद, पोलीसनामा ऑनलाईन : औरंगाबादमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी एम.बी.बी.एसचे शिक्षण घेत होता. या 25 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव यश नरसिंगराव गंगापूरकर (Yash Narsingrao Gangapurkar)
असून तो औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यश गंगापुरकर हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तो आपल्या आईसोबत गेल्या काही दिवसांपासून बेगमपुरा येथील ब्राम्हण गल्ली येथे एक खोली घेऊन राहत होता. तो 25 डिसेंबरच्या दिवशी घाटी रुग्णालयात एका रुग्णावर उपचार करून घरी परतला होता.

या दरम्यान त्याने दुसऱ्या दिवशी राहत्या घरी जवळपास दुपारी 11 च्या सुमारास विष प्राशन केले. जेव्हा कुटुंबियांना समजले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांसोबत झालेल्या संभाषणाची कसून तपासणी केली असून महाविद्यालयात कुण्या शिक्षकांमुळे तो तणावाखाली जगत होता का याची माहिती घेतली. मात्र तपास अधिकारी राजकुमार जाधव यांनी सांगितलं की आत्महत्येचे कारण अद्याप तरी समजू शकलेले नाही.