युवकाची हत्या करून व्हिडीओ पत्नीच्या मोबाईलवर पाठवला, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –    एका 35 वर्षांच्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून (35-year-old-man-murdered) केल्याची घटना बुधवारी ( दि. 21) सकाळी त्याच्या पत्नीच्या मोबाइलवर व्हिडिओ क्लीप (video-sent-on-wife-mobile) आल्याने उघडकीस आली. औरंगाबादमधील रांजणगाव शेणपुंजी येथे ही घटना घडली. अज्ञात मारेकऱ्याने मृताच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ पाठवला आहे

भीमराव दिगंबर सावते (रा. मातोश्रीनगर गल्ली नंबर १) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव याची पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून मुलासह माहेरी (मंगरूळ ता. मानवत, जिल्हा परभणी) येथे राहत होती. त्यामुळे भीमराव हा एकटाच राहत होता. बुधवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर भीमरावचा जखमी अवस्थेतील व्हिडिओ दिसला, त्यानंतर नऊच्या सुमारास संशयित आरोपीने फोन करून अपघात झाल्याचे सांगितले. तिचे वडील रांजणगाव येथे आले असता त्यांना भीमराव मृतावस्थेत आढळला. त्यांचा चेहरा व हातावर तीक्ष्ण हत्याराचे वार दिसून आले. तो ट्रान्स्पोर्टचा व्यवसायिक असून त्यांच्याकडे आयशर ट्रक होता. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिर्याणीची प्लेट, दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्यावरून भीमराव सोबत रात्री कोणीतरी होते, दारू पिल्यानंतर वाद होऊन किंवा पूर्ववैमनस्यातून खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मारेकऱ्याने मृताच्या मोबाइलवरूनच आणखी एकला फोन करून मी बदला घेतला, असे सांगितल्याने मारेकरी नातेवाईक किंवा ओळखीचा असावा, असा अंदाज आहे.