Coronavirus : औरंगाबादेत वृद्धेला झाडाखालीच लावले ‘ऑक्सिजन’, टीकेनंतर यंत्रणा हादरली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमध्ये आरोग्य यंत्रणेची अब्रु वेशीवर टांगणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबाद कोविड सेंटरमध्ये खाटा रिकाम्या असतानाही एका कोरोनाबाधित वृद्ध महिलेला चक्क झाडाखाली ऑक्सिजन लावल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. झाडाखाली ऑक्सिजन लावल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या वाळूजमधील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये शनिवारी उघडकीस आला आहे. एका 67 वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेला कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने तिला गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी 40 खाटा रिकाम्या असताना देखील या महिलेला सेंटरच्या बाहेर असलेल्या एका झाडाखाली बसवण्यात आले. या महिलेच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण 82 टक्के असल्याने या वृद्ध महिलेला झाडाखालीच बसवून ऑक्सिजन लावण्यात आला.

या घटनेचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकाराबाबत राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाला जाग आली. त्यानंतर या वृद्ध महिलेला तातडीने गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या वृद्ध महिलेवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना जागेवरच ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून या महिलेला गंगापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती कम्युनिटी सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली.