Aurangabad News : ढाब्यावरील काम आटोपल्यानंतर घरी परतताना अपघात, दोघे जागीच ठार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी रस्त्याच्या खाली असलेल्या खड्डयात आदळून दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (ता. २२) रोजी मध्यराञीच्या सुमारास रोहिलागड- दाभरुळ रस्त्यावरील दाभरुळ (ता.पैठण) शिवारात घडली. अनिस गफुर पठाण, संगिता दळवे असे मयतांची नावे आहेत. हे दोघे ढाब्यावरचे काम आटोपल्यानंतर घरी परत होते.

अनिस गफूर पठाण (वय ४० वर्षे) राहणार, इस्लामपुरा, बीड हल्ली मुकाम आपतगाव (ता.औरंगाबाद) व संगीता दळवे (वय ४५ वर्षे ) राहणार बीड हे मातोश्री ढाबा, रोहिलागड येथे आचारीचे काम करीत होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर शुक्रवारी (ता.२२) रोजी मध्यराञीच्या सुमारास घरी (आपतगाव) येथे विना नंबरच्या दुचाकीने परत येत असताना दाभरुळ शिवारातील एका वळण रस्त्याचा अंदाज आला नसल्याने दुचाकी रस्त्याच्या खाली उतरुन खड्डयात पडली. त्यात दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीस्वार अनिस पठाण व संगिता दळवे हे जागीच ठार झाले.

दरम्यान, शनिवारी (ता. २३) रोजी सकाळी रस्त्याने चालणाऱ्या एक जण तिथे थांबला असता त्याला येथे अपघात झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. महामार्ग पोलिस जालना ऋषिंद्र राऊत, दिनकर मोरे, तान्हाजी कान्होरे यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती जाणून घेतली. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, बीट जमादार गोरखनाथ कणसे, चालक काकडे, अफरोश पठाण यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री घडली, या मार्गावर जास्त वाहन चालत नसल्याने येथे राञी अपघात झाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यात अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या सात आठ फुट खोल खड्डयात जाऊन पडली होती. त्यामुळे कोणाचीही नजर या अपघातावर पडली नव्हती त्यामुळे हे दोन्ही मृतदेह तब्बल १० ते १२ तास जागेवरच पडून होते.