Aurangabad News : मेहुण्याने पत्नीचे लग्न दुसऱ्यासोबत लावून दिल्याने पतीची आत्महत्या

पाचोड (जि. औरंगाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन – माहेरी गेलेल्या पत्नीचा विवाह मेहुण्याने त्याच्या मेहुण्यासोबत लावून दिल्याने पत्नीस आणावयास गेलेल्या पहिल्या पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 19) घडली आहे. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी पत्नी, मेहुण्यासह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुकेश रहेमान चव्हाण (वय 36) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेशच्या आत्महत्येस त्याचा मेहुणा अशपाक काळे, घाऱ्या काळे, पत्नी साक्षी, बाल्या भोसले (साक्षीचा दुसरा नवरा) हेच जबाबदार असल्याचे मुकेशचे वडिल रहेमान महादु चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मुकेशचा विवाह साकेगाव (ता. पाथर्डी) येथील साक्षी सोबत झाला होता. साक्षी तिच्या माहेरी आईवडीलांना भेटण्यासाठी गेली होती. तिला माहेरी जाऊन बरेच दिवस झाल्याने मुकेश तिला घ्यायला सोमवारी (दि. 19 ) साकेगाव येथे गेला होता. त्यावेळी साक्षीचा भाऊ तथा मुकेश चव्हाणचा मेहुणा अशपाक काळे याने साक्षीचा विवाह त्याचा मेहुणा बाल्या जैनराव भोसले (रा. खडोबा एरंडगाव, (ता. शेवगाव, जि. नगर) सोबत लावून दिल्याचे लक्षात आले. यामुळे मुकेशला मानसिक धक्का बसल्याने त्याने दारु प्राशन करून त्यावर विषारी औषध घेतले. ही बाब अशपाक काळे व धाऱ्या काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी मुकेश चव्हाण यास मंगळवारी (दि. 19) त्याला दुचाकीवर बसवून खंडाळा येथे आणून सोडले व कुणाला काही एक न सांगता निघून गेले.

यावेळी मुकेशने घडलेला सर्व प्रकार कुटुबियांना सांगून आपल्या छातीत त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने कुंटबियांनी मुकेशला उपचारासाठी विहामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. बुधवारी (दि. 20) सकाळी पाचोड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून उत्तरणीय तपासणीसाठी वैद्यकिय अधिकाऱ्यास अहवाल दिला. डॉक्टरांनी विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड करीत आहे.