औरंगाबादेत भावा बहिणीची हत्या करुन दीड किलो सोन्याचे दागिने लुटले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादेत बहिण भावाची हत्या करुन त्यांच्या घरातील दीड किलो सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारेकर्‍यांनी घरातील सुमारे दीड किलो सोने, साडे सहा हजार रुपये असा ऐवज लुटून नेला. आई वडिल हे शेताच्या कामासाठी जालना येथे गेले होते. त्यामुळे घरात भाऊ बहिण असे दोघेच होते.

किरण लालचंद खंदाडे – राजपूर (वय १८) आणि सौरभ लालचंद खंदाडे – राजपूत (वय १६) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, लालचंद खंदाडे हे सातारा परिसरातील कनकोरबेननगरमध्ये २०१७ पासून बंगला भाड्याने घेऊन पत्नी, मुलगी सपना (वय २१) आणि सौरभ यांच्यासह राहत होते.

सौरभ हा येथील पोद्दार शाळेत दहावीत शिकत होता. यंदा त्याने दहावीची परीक्षा दिली होती. तर किरण ही पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या प्रथम वर्षाला त्यांची मोठी बहिण सपना तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. खंदाडे यांच्या परिवाराची जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव येथे शेती आहे. खंदाडे हे शेती करतात. त्यांची पत्नी अनिता या एलआयसीमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करतात. लालचंद यांनी बोलविल्यामुळे मंगळवारी सकाळी खंदाडे यांची पत्नी अनिता व मुलगी सपना हे कारने पाचनवडगावला गेले होते. किरण आणि सौरभ हे दोघेच घरी होते. दुपारी त्यांनी फोन करुन जेवण झाले का अशी चौकशीही केली होती.

लालचंद यांची पत्नी, मुलगी सपना आणि सासू रात्री साडेआठ वाजता औरंगाबादला घरी परतल्या. तेव्हा त्यांनी मुलांना आवाज दिल. पण त्यांनी गेट उघडले नाही. तसेच बंगल्याचे दारही लोटलेले होते. सर्व जण आत गेले. तेव्हा त्यांना बाथरुममध्ये किरण आणि सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दोघांचे गळे कापलेले होते. तसेच डोक्यावर जखमा होत्या. घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि साडेसह हजार रुपये चोरीला गेल्याचे आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरु केला आहे.
सौरभ याला कॅरम खेळण्याची आवड होती. त्याच्या खोलीत कॅरम बोर्ड ठेवलेला होता. सौरभ व किरण हे कॅरम खेळत असताना कोणीतरी घरात आले व त्यांनी या दोघांना धमकावून घरातील दागिने लुटले व त्यांचे गळे चिरुन नंतर त्यांना बाथरुममध्ये नेऊन टाकले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारण घरात कॅरमचा डाव अर्धवट असल्याचे दिसून आले.