Aurangabad News : प्राध्यापिकेला सोबत रहा म्हणून वेळावेळी त्रास देणार्‍या प्रा.निरज साळूंकेची शिक्षा कायम

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  एका प्राध्यपकाला विनयभंग प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा ठोठाविलेली होती. तीच शिक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी कायम केली. नीरज अण्णासाहेब साळुंके (३९, रा. तीरुपती सुप्रीम इव्हेंट, जालाननगर) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. प्राध्यापक महिलेला ‘माझ्यासोबत रहा’ म्हणून वांरवार त्रास देत, तिचा रस्ता अडवून हात धरत होता.

या प्रकरणात एका प्राध्यापक महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १२ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला प्राध्यापक या कर्तव्यावर असताना आरोपी नीरज तेथे आला. त्याने फिर्यादीला ‘तू माझ्यासोबत रहा’ असे म्हणत असा तगादा लावला. ही घटना घडण्यापूर्वी वर्षभरापासून आरोपी हा फिर्यादी प्राध्यापिकेला त्रास देत होता. फिर्यादी ही एकदिवस रस्त्याने जात असताना आरोपीने तिला अडवून तिचा हात पकडला व तिला लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिली. प्रकरणात बेगमपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्ह्यात २३ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीना पाटील यांनी आरोपीला नीरज याला दोषी ठरवून भादंवि कलम ५०६ अन्वये १५ दिवस कारावास व ३०० रुपये दंड, कलम ३५४ अन्वये दोन महिने कारावास आणि ३०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली होती. तसेच दंडाची रक्‍कम ही फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला नीरज याने जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले असता प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी कलम ५०६ अन्वये दिलेली शिक्षा रद्द केली तर कलम ३५४ अन्वये ठोठाविलेली शिक्षा कायम ठेवली. प्रकरणात सहायक लोकाभियोक्‍ता विनोद कोटेचा यांनी काम पाहिले.