औरंगाबादमध्ये ‘लॉकडाऊन’ कडक, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत सात हजारांच्या वरती लोकांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. तर तीनशे पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणाखाली वावरत आहेत. म्हणून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता शहरात पुन्हा एकदा १० ते १८ जुलै दरम्यान आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दुचाकी, खाजगी पेट्रोल पंप बंद राहतील, नागरिकांनी बाहेर पडल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच घरी रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

यासंदर्भात गुरुवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आदेश काढले. लॉकडाऊन मध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरता जास्तीत जास्त चाचण्या केल्या जातील. तसेच या काळात दुचाकीवरुन प्रवास करण्यास शहरात बंदी असेल. दूध विक्री व वर्तमान पत्रे विक्रेत्यांना सकाळी सहा ते आठ वेळ निश्चित करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोल पंप फक्त सुरु राहतील. बँकांसह काही अत्यावश्यक सेवा नियमांचे पालन करण्याच्या अटींवरती सुरु ठेवण्यात येणार आहे, असे पांडेय यांनी सांगितले.

शहरात यांना असेल फिरण्यास मुभा

न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, मीडिया कर्मचारी, शासकीय व केंद्र सरकारचे कर्मचारी, शासन अंगीकृत संस्थांचे कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर, नर्स, अंगणवाडी सेविका, मेडिकल शॉप व औषधे निर्मिती कारखान्यांचे कर्मचारी, दूध विक्रेते, अत्यावश्यक सेवा. यामध्ये कृषी, बि-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचारी, महापालिका व पोलीस विभागाचे कर्मचारी, सर्वेक्षण करणारे कर्मचारी.

हे राहतील बंद

१. किराणा दुकाने , व्यावसायिक दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग
२. मैदाने, क्रीडांगणे, खुल्या जागांवर फिरण्यास बंदी.
३. उपाहारगृह, लॉज, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट.
४. केश कर्तनालये, सलून, मसाज पार्लर, स्पाची दुकाने.
५. जाधवमंडी, जुना-नवा मोंढा, भाजीमार्केट, किरकोळ-ठोक विक्री.
६. खासगी वाहने- दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, मालवाहतूक.
७. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था.
८. खासगी व सार्वजनिक बस सेवा.
९. बांधकामे, कन्स्ट्रक्शनची कामे.
१०. करमणुकीची सर्व साधणे, मंगल कार्यालये, धार्मिक सभा.
११. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना, कार्यालये.
१२. होम डिलेव्हरी सेवा देखील बंद राहतील.

काही शिथिलतेसह या सेवा सुरु

१. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत शिथिलता
२. सार्वजनिक व खासगी वैद्यकीय सेवा नियमित वेळेनुसार सुरु राहतील.
३. सर्व रुग्णालये, त्यांच्याशी निगडित सर्व सेवा सुरु राहतील. तसेच रुग्णांना लॉकडाऊन काळात उपचाराची सेवा नाकारता येणार नाही. जर उपचार करण्यास रुग्णालयांनी टाळाटाळ केल्यास रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल.
४. मेडिकलची सर्व दुकाने २४ तास सुरु राहतील.
५. न्यायालये, शासकीय कार्यालये शासन नियमानुसार सुरु राहतील.
६. शासकीय पेट्रोल पंपावर केवळ सरकारी वाहने, अत्यावश्यक सेवा यांनाच इंधन मिळेल. त्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी दोन पर्यंत असेल.
७. शहरातील इतर खासगी सर्व प्रकारचे पेट्रोल व डिझेल पंप बंद राहतील.
८. गॅस एजन्सी व घरपोच सेवा सुरु राहील. दुचाकीवरती गॅस नेण्यास बंदी.
९. शासकीय स्वस्त धान्याची दुकाने नियमित वेळेनुसार सुरु राहतील.
१०. वर्तमानपत्र वितरण, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाची कार्यालये सुरु राहतील.
११. निर्यात वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.
१२.आरबीआयच्या मान्यता प्राप्त बँका सुरच राहतील. मात्र ग्राहकांना बँकेत बंदी राहील. तसेच बँकांत केवळ ऑनलाइन ग्राहक सेवा, घरपोच कॅश डिलेव्हरी सेवा, एटीएम सुरू राहील.