राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तसेच माजी पंचायत समिती सदस्य काकासाहेब श्रीधर कणसे (42, रा. धनगाव, पैठण) यांनी रविवारी (27 सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कणसे यांनी घाटी रूग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काकासाहेब श्रीधर कणसे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे 21 सप्टेंबरला कोरोना चाचणी आढळून आले होते. यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते. श्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना 24 सप्टेंबरला दुपारी चार वाजता अतिदक्षता विभागाच्या वॉर्डात हलवण्यात आले. येथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर जाधव यांनी सांगितले की, आज रविवारी सकाळी त्यांनी हॉस्पीटलमधील एका चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यास आपल्याला शौचालयाला जायचे असल्याचे सांगितले. मात्र, व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांना पॉट देण्यात आले. त्यानंतर कर्मचारी बाहेर थांबले. याचवेळी काकासाहेब कणसे यांनी त्यांच्या बेडजवळील खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी बेगमपूरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

प्रकरणाच्या चौकशीच्या मागणी
पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी काकासाहेबांनी आत्महत्या का केली? याची चौकशी व्हायला करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. वाघचौरे हे घाटीच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आले होते. त्यांनी घटनेबाबत डॉक्टरांशी संवाद साधला.

24 सप्टेंबरला काकासाहेब कणसे यांना व्हेंटिलेटर मिळूवन देण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. बेड उपलब्ध असूनही दोन तासांनी काकासाहेबांना बेड देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

खासगी रूग्णालयात दाखल करा म्हणाले
आजच रविवारी (27 सप्टेंबर) पहाटे पाच वाजताच्या सुमारास कणसे यांनी त्यांचा भाऊ गणेश कणसे यास फोन करून धनगावहून औरंगाबादला येण्यास सांगितले. निम्म्या वाटेत असताना काकासाहेब यांनी पुन्हा भावाला फोन केला आणि मला खासगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. गणेश कणसे हे हॉस्पीटलमध्ये आले पण त्यांना आत जाऊ दिले नाही. अखेर सकाळी 11 वाजता काकासाहेब कणसे यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती त्यांचे भाऊ गणेश कणसे यांनी दिली.

पत्नीही पॉझिटिव्ह
काकासाहेब कणसे यांच्या पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर चित्तेगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्या सकाळपासून सतत संपर्क साधून पतीची प्रकृती कशी आहे याबाबत माहिती घेत होत्या. कारण त्यांना पतीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती.