आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का ? एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, मांडली विदारक स्थिती

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. राज्यातील एसटी कर्मचारीही अडचणीत आले आहेत. अशातच औरंगाबादमधील एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. राज्यातील एसटी वाहतूक देखील बंद असल्याने कोट्यावधी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. याचा परिणाम महामंडळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने त्यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आम्ही दोन बहिणी आहोत. आमचे शिक्षण बाकी आहे. आता कोरोनाच्या अशा परिस्थितीत आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का ? असा सवाल औरंगाबादमधील एका एसटी कर्माचाऱ्याच्या मुलीने पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना सामाजिक मध्यमातून केला आहे.

नंदिनी सुरवसे असे या मुलीचे नाव असून तिचे वडील एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. नंदिनी ही 12 वी विज्ञान शाखेत शिकत आहे. कोरोनामुळे मार्चपासून एसटीची सेवा कोलमलडली आहे. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती नंदिनी हिने पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. नंदिनीने आपल्या पत्रात लिहीले आहे की, कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही.

आमची घरची परिस्थिती बिकट आहे. गावाकडे शेती नाही. एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय मरणाच्या दारात उभे आहेत. त्यांना फक्त मायबाप सरकार वाचवू शकते. ही सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. तरीही शासन एसटीला शासनात का विलीन करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. नंदिनीने मांडले विदारक सत्य काही कर्मचारी भाजी विकत आहेत. कोणी गंवंडी काम करत आहे. कर्मचाऱ्यांचा पगार अत्यल्प आहे. त्यातच कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना कमीत कमी दहा ते पंचवीस हजार रुपये लागतात. असे तिने म्हटले आहे.