प्लॉटच्या वादातून सख्या भावाचा स्क्रु ड्रायव्हरने भोसकून खून !

औरंगाबादः पोलीसनामा ऑनलाईन – प्लॉटच्या वादातून सख्या लहान भावानेच रिक्षाचालकाचा स्क्रु ड्रायव्हरने भोसकून खून केला. शहानगर भागात रविवारी (दि. 13) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊ आणि पुतण्यांनी मिळून हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.

शामराव रामभाऊ साबळे (वय 57 रा. अशोकनगर, मसनतपूर, चिकलठाणा) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मृत शामराव यांचे जावई जीवन जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे, शामराव साबळे यांचे लहान भाऊ भाऊलाल साबळे यांच्यासोबत प्लॉटवरून वाद सुरु होते. रविवारी दुपारी शामराव हे मुलगा प्रदीप सोबत भाडे घेऊन शहानगर भागात गेले होते. प्रवाशी सोडून ते घराकडे येत असताना भाऊलाल, प्रमोद, विनोद आणि विशाल ही तीन मुले व मेहुणा शेषेराव वाहुळ यांनी त्यांची रिक्षा अडवली. त्यानंतर त्यांना पाच जणांनी बेदम मारहाण करून स्क्रु ड्रायव्हरने भोसकले. यात शामराव जागीच बेशुध्द पडले. जावई जाधव आणि मुलगा प्रदीप यांनी जखमी शामरावला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील प्लॉटच्या वादातून शामराव यांना भाऊलाल आणि त्यांच्या मुलांनी मारहाण केली होती. त्यावेळी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता.