शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू, 24 तासात दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनालाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधित रुग्ण्याांच्या संख्येत भर पडत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंता अधिकच वाढली आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचे निधन झाले आहे.

शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक रावसाहेब आमले यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज पहाटे चार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रावसाहेब आमले यांच्यावर आज प्लाझमा थेरपी होणार होती. मात्र, थेरपी करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 24 तासात दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

आमचे दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक हे सक्रीय होते. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी गरजू लोकांसाठी मदतीचे कार्य केले होते. धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी 10 वाजता प्लाझमा थेरपी देण्याचे ठरले होते. यासाठी दोन प्लाझमा दान करणारे व्यक्तीही समोर आले होते.पण, त्याआधीच आम्हाला दुख:द बातमी मिळाली, अशी भावना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. मंगळवारी नगरसेवक नितीन साळवी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर आणखी एका नगरसेवकाच्या निधनामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.