गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषानं 56 लाखांची फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गॅस एजन्सी (Gas Agency) मिळवून देतो, अशी थाप मारून वाळूज येथील एका व्यावसायिकास 56 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोघांना सायबर गुन्हे शाखेच्या (Cyber Crime) पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अटक केलीय. काळू शेख मोहम्मद शेख (36) व मोहम्मद अवसान रजा (28, दोघंही ह.मु सांगोला, जि सोलापूर मूळ राह. साहेबगंज, झारखंड) अशी अटक झालेल्यांची नावं आहेत.

सायबर गुन्हे शाखेनं ही कारवाई करत थाप, मारून नागरिकांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आतंरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. अनेक सदस्य या टोळीत सक्रिय असून या ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या इथर साथीदारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचं एक पथक उद्या झारखंडकडे रवाना होणार आहे.

नेमकं प्रकरण काय ?
वाळूज येथील रहिवासी चांगदेव सोमनाथ तांदळे (49) यांची रवीकिरण एन्टरप्रायजेस ही संस्था आहे. य माध्यमातून ते इंडस्ट्रीयल सप्लायचा व्यवसाय करतात. वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार, तांदळे यांनी जळगाव येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कार्यालयात जाऊन पंढरपूर ( वाळूज) येथे गॅस एजन्सीसाठी 28 ऑगस्ट 2019 रोजी अर्ज केला होता. त्यानंतर 21 जानेवारी 2020 रोजी त्यांनी याच कार्यालयात मुलाखत दिली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकावर त्यांची निवड झाली. त्यानंतर 5 मे 2020 रोजी संदीप पांडे नावाच्या व्यक्तीनं तांदळे यांना फोन करून गॅस एजन्सीसाठी कागदपत्रे व फोटो मेलवरून मागवून घेतले. गॅस एजन्सी मिळवून देण्यासाठी त्यानं तांदळे यांना 56 लाख 66 हजार खर्च येईल असं सांगत खर्चाचं विविरणही समजून सांगितलं.

पांडे यानं तांदळेंना सतत संपर्क करत विश्वास संपादन केला. त्यामुळं पांडे यानं दिलेल्या बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंड्सइंड बँक आणि कॉर्पोरेशन बँक खात्यावर तांदळे यांनी 6 मे ते 7 ऑगस्टपर्यंत तब्बल 56 लाख 61 हजार 700 रुपये जमा केले. काही दिवसांनी तांदळे यांना काही शंका आली. यानंतर त्यांनी जळगाव येथील कार्यालयशी संपर्क साधत पांडे यांच्या बद्दल विचारपूस केली. तेव्हा पांडे नावाचा कोणीही कर्मचारी आमच्या कार्यालयात नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तेव्हा तांदळेंच्या लक्षात आलं, की आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी थेट सायबर गुन्हे शाखा गाठली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.

देशभरात हे रॅकेट सक्रिय
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितलं, की केरळ आणि कर्नाटकमध्येही या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली आहे. तांदळे यांनी जमा केलेल्या बँक खात्यांचे नंबरही तेच आहेत. देशभरात हे रॅकेट सक्रिय असून टोळीत अनेक सदस्य असण्याची शक्यता आहे. काळू आणि मोहम्मद हे पूर्वी वाशी मार्केटमध्ये (नवी मुंबई) हमाली करायचे. आता ते शेतकऱ्यांकडून डाळींब घेऊन ते व्यापाऱ्यांना देण्याचा दलालीचा धंदा करत आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून ते सांगोल्यात डाळींबाच्या व्यवसायासाठी भाड्यानं राहात होते. फसवणूक केलेला पैसा ते या व्यवसायात वापरतात.