भाजपला दणका ; मराठवाडयातील ‘या’ नगरपरिषदेत काँग्रेस कडून दारुण पराभव

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड नगरपरिषदेत काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे. काँग्रेसने सत्ता कायम राखण्या सोबत २४-२ असा भाजपचा दारुण पराभव केला आहे. त्याच प्रमाणे नगराध्यक्ष पदावर काँग्रेसच्या राजश्री राजरत्न निकम विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या अशोक तायडे यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.

भाजपला या निवडणुकीत मागच्या निवडणुकीतील जागा सुद्धा कायम राखता आल्या नाहीत. आमदार अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यात हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या लढतीमध्ये सत्तार यांनी पुन्हा रावसाहेब दानवे यांना मात दिली आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २६ जागांसाठी १०४ उमेदवार रिंगणात होते. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी या नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन करण्यासाठी मोठा तगादा लावला होता. मात्र त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.

भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणनीतीकार गिरीश महाजन यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आणि निवडणुकीची रणनीती आखली तरी जनतेने भाजपला या नगरपरिषदेत नाकारले आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे या नगरपरिषदेचे मावळते नगराध्यक्ष होते. या दोघाही पितापुत्रांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्यात आमदार सत्तार पिता पुत्रांनी बाजी मारली आहे.