अनपेक्षित ! अंत्यत चुरशीच्या लढतीत इम्तियाज जलील विजयी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक नाट्यमय घडामोडींमुळे गाजलेल्या औरंगाबाद मतदार संघात शेवट्पर्यंत चुरशीची लढत झाली. तिरंगी झालेल्या या लढतीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचे मताधिक्य घटले व त्यांना ४,४९२ मतांनी पराभव पत्करावा लागला.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एकूण मतदार १८ लाख ८४ हजार ८६६ मतदार आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . या मतदार संघात ५९. ४५% टक्के मतदान झाले होते. त्यापैकी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना ३ लाख ९० हजार ०४२ इतकी मते मिळाली. तर शिवसेनेच्या खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मते मिळाली. हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ५५० मते मिळाली तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना ९१ हजार ७८९ मते मिळाली.

चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाची कारणे –

शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे मतदान विभागले गेले.

भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे आमदार इम्तियाज जलील यांना मुस्लिम मतांबरोबरच वंचित बहुजन आघाडीची मते मिळाली. तसेच एमआयएममुळे काँग्रेसचे मतविभाजन झाले.

नोटाला ४९२९ मते मिळाली. जलील यांना मिळालेल्या आघाडीपेक्षा नोटाला जास्त मते मिळाली.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांत मराठा समुदायाचं वर्चस्व आहे. कन्नड, औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. औरंगाबादची जागा एमआयएमकडे आहे. औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर भाजपकडे आहे. तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आहे. केवळ एक जागा एमआयएमकडे असताना जलील यांनी विजय मिळवला.