‘तिला’ भेटण्यासाठी उस्मानाबादच्या तरुणानं गाठली पाकिस्तानची ‘बॉर्डर’, जाणून घ्या प्रकरण

उस्मानाबाद : वृत्त संस्था  – प्रेम माणसाला कुठे घेऊन जाऊ शकते, याचा काही नेम नाही. प्रेम आंधळं असं म्हणतात, आणि प्रेमात आकंठ बुडालेले सुद्धा आंधळे झालेले असता. त्यांना कशाचीही पर्वा नसते, प्रेमासाठी ते सातासमुद्रापारही जाऊ शकतात. असाच एक प्रेमवीर महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये सापडला आहे. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी तरूणीच्या प्रेमात पडलेला हा तरूण तिला भेटण्यासाठी उस्मानाबादहून निघाला तो थेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर पोहचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उस्मानाबादच्या ख्वाजा नगरमध्ये राहाणारा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत असलेल्या या 22 वर्षीय तरूणाचे नाव आहे झिशान सिद्दीकी. सोशल मीडियावर तो टाइमपास करत असताना काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख पाकिस्तानमधील एका तरूणीशी झाली. दोघे एकमेकांशी चॅटींग करू लागले, हळुहळु या ओळखीचं रूपांतर मैत्रित आणि मैत्रिचं रूपांतर पेमात झालं. दोघेही चॅटिंगद्वारे एकमेकांशी दररोज संवाद साधत होते. परंतु, नंतर या प्रेमाची ओढ इतकी वाढत गेली की, एकदिवस तिला भेटण्याचा निर्णय झिशानने घेतला. लॉकडाऊनचाही विचार न करता त्याने तिला भेटायला जाण्याची तयारी केली आणि मोटरसायलने तो थेट भारत-पाक सीमेकडे निघाला.

झिशान मोटरसायकलने उस्मानाबादहून नगर आणि तेथून तो गुजरातला गेला. परंतु, कच्छमध्ये मोटरसायकवरून तो जात असताना त्याची दुचाकी वाळूत फसली. नाईलाजाने त्याला पुढील प्रवास पायी करावा लागला. पायी चालत तो पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहचला. दरम्यान, बीएसएफच्या जवानांना वाळूत फसलेली झिशानची मोटारसायकल आढळल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. आणि काही अंतरावर झिशान त्यांना सापडला. वाटेत ठिकठिकाणी पोलिसांची नजर चुकवत भारत-पाक सीमेपर्यंत पोहचलेल्या झिशानला गुरुवारी रात्री 9.30 वाजता कच्छमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.

झिशानला बीएसएफ जवानांनी पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी केली, यावेळी त्याने आपली सोशल मीडियावरील प्रेमकहानी बीएसएफला सांगितली. पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी पायी जात असल्याचे त्याने कबुल केले. परंतु, त्याच्या दाव्यातील तथ्य तपासण्यासाठी बीएसएफने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, उस्मानाबाद येथून पोलिसांची एक तुकडी झिशानला ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तान सीमेकडे रवाना झाली आहे. शिवाय महाराष्ट्रातील एक तरूण भारत-पाक सीमेवर पकडला गेल्याने उस्मानाबादसह औरंगाबाद आणि मुंबई पोलीस देखील अलर्ट झाले आहेत.