राष्ट्रवादी आणि शिवसेना वॉर : अजित पवारांना ताफ्यासह जाळू , शिवसेनेचा इशारा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याच्यातील वाद आता खालच्या पातळीवर जाऊन पोहचली आहे. या दोघांच्यातील शाब्दिक वादामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला आहे. बीड येथे शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आज दहन केलं. यावेळी अजित पवारांवर टीका करताना शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा तोल सुटला. बीडमध्ये आल्यास अजित पवारांना ताफ्यासह जाळू, असा इशारा खांडे यांनी दिला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, जयसिंग चुगडे, हनुमान पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांविरोधात शिवाजी चौकात घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा तोल सुटला. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची लायकी नाही. अजित पवार भ्रष्ट,चोर आहेत’, असा आरोप करत त्यांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. अजित पवारांनी बीड जिल्ह्यात येऊन दाखवावं. ते बीड जिल्ह्यात आले तर ताफ्यातील गाड्यासह त्यांना जाळू, असे खांडे म्हणाले. तसंच राम मंदिर होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाकिस्तानकडून सुपारी घेतली आहे. त्यामुळेच ते शिवसेनेच्या राम मंदिराच्या भूमिकेला विरोध करत आहेत. मात्र, शिवसेना राम मंदिर बांधनारच, असं कुंडलिक खांडे म्हणाले.

रोहित पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, “बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा! त्या सांभाळाचा अर्थ काल समजला, त्याचा अर्थ आमचा मुलगा अल्लड आहे त्याला सांभाळून घ्या असाच असावा. बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते. मार्मिक असो कि सामना त्यांनी टीका देखील जहाल केली, पण त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गरळ ओकून त्यांच्याच लेखणीचा अपमान केला. उद्धव ठाकरे कधी लोकांच्यातून निवडून आले नाहीत की मातोश्रीच्या बाहेर पडून उभा महाराष्ट्र पाहण्याचं देखील साधं कष्ट घेतलं नाही. महाराष्ट्र जळत असताना हे महाशय सत्तेत भागीदार होवून सर्वसामान्यांना भुलवण्याचं काम करत आहेत. इतका लेख लिहण्याच्या ऐवजी दोन ओळींचा राजीनामा दिला असता तरी आपल्या वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पहायला मिळाला असता.”

कोण आहेत रोहित पवार ?

रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब यांचे नातू रोहित आहेत. रोहित पवार सध्या बारामती जिल्हा परिषद सदस्य आहेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे सामनातून

राजकारणी लोकांचे पातळी सोडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले की, निवडणुका येत आहेत हे समजते. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

अजित पवार यांच्यावर आजच्या सामनामधून अतिशय शेलक्या शब्दात टीका झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना काडीमात्र किंमत नाही. केवळ काकांच्या पुण्याईमुळेच ते आजवर तरले आहेत अशा शब्दात त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. इतकेच नाही तर कळस म्हणजे ‘खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही’, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेनेने अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. अयोध्येत राम मंदिराला विरोध करणं हेच अजित पवारांचं धोरण आहे. इतकंच नाही तर त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला आहे. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरुन अजित पवार यांनी टीका केली होती. पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार ?, असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आले.

अजित पवारांची प्रतिक्रिया

शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती इतकेच नाही तर शिवसेनेला इतक्या मिरच्या का झोंबल्या ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विनाशकाले विपरीत बुद्धी असा उल्लेख करत अजित पवार यांनी सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी काय उल्लेख होता सामन्यात ?

अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या छंदाविषयी टोला लगावला होता. यावर उद्धव ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिले होते, याची आठवणही अग्रलेखात करुन देण्यात आली. ‘या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. पण आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. आम्ही आमच्या पंढरीची वारी, शिवरायांचे गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे जे छंद जोपासले आहेत ते उघडपणे करू शकतो. पण अजित पवार त्यांच्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकतील का ? या गटारी किड्याचे नेमके काय छंद आहेत व त्या छंदांसाठी त्याने साताऱ्यात काय रेशमी उद्योग सुरू केले त्याविषयीची सखोल माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले देऊ शकतील, असे शिवसेनेने म्हटले आहे.