Aurangabad News : आईच्या मृतदेहाशेजारीच खेळत राहिली 2 लहान मुलं; खून करून बाप झाला फरार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कौटुंबिक वादातून पतीने अगोदर रॉडने व नंतर दगडाने ठेचून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील पिसादेवी भागात मंगळवारी उघडकीस आली. कविता सिद्धेश त्रिवेदी (वय ३२) असं मृत महिलेचं नाव आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे हि हत्या केल्याचे समोर आले असून आईच्या हत्येची कोणतीच कल्पना नसलेली तिची २ लहान मुलं तिच्या मृतदेहाच्या आसपासच अनेक तास खेळत होती. हत्येनंतर मृतदेह आणि दोन्ही मुलांना सोडून निर्दयी पती पसार झाला. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. सिद्धेश गंगासागर त्रिवेदी असं फरार पतीचं नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कौटुंबिक कारणातून सिद्धेश आणि कविता यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सिद्धेश याने आपल्या पत्नीवर रॉडने वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने दगडाने ठेचत पत्नी कविता हिचा जीव घेतला. हे सर्व सुरु असताना दोन्ही लहान मुलं तिथेच होती. मात्र आईच्या जीवावर आपला जन्मदाता बापच उठला आहे, हे कळण्याइतकं या मुलांचं वय नव्हतं. दरम्यान सिद्धेशने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांकडून फरार पतीचा शोध घेण्यात येत आहे.