गर्भपात करुन गर्भ चेंबरमध्ये फेकणाऱ्या डॉक्‍टरचा पर्दाफाश

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मदर केअर रुग्‍णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात गर्भपात करुन तो गर्भ चेंबरमध्ये टाकला जायचा. अशा गर्भपात करुन तो गर्भ चेंबरमध्ये टाकणाऱ्या डॉक्‍टरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलिस उपनिरीक्षक मीरा लाड आदींनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी मनपा पथकाच्या मदतीने रुग्‍णालयात खोदकाम केले असता चेबंरचे हे गूढ समोर आले. विशेष म्हणजे या खोजकामात प्रत्येक खोलीत एक असे चार चेंबर आढळून आले. या चेंबरला १२ इंची पाईप जोडून ते मनपाच्या मेन ड्रेनेजला जोडण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलिसांनी डॉ. वर्षा सरदारसिंग शेवगण ऊर्फ अंजली अजय राजपूत (38, रा. मधुबन हौसिंग सोसायटी, एपीआय कॉर्नर) हिला अटक केली आहे. वर्षा शेवगण ही नाचनवेल (ता. कन्नड) येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी असून ती एपीआय कॉर्नर येथील मदर केअर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करत होती. अटक केल्यानंतर वर्षा हिला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्या या सर्व प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी जिल्हा परिषदेला पाठवल्याचे समजत आहे.

नेमका प्रकार काय ?

डॉ. सुरज राणा पंधरा हजार रुपये घेऊन मुलगा आहे की मुलगी आहे हे तपासून देण्याचे काम करायचा. २३ जानेवारी रोजी मनपाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. सुरज राणाचा पर्दाफाश केला होता. यासंदर्भात उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास जवाहरनगर ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक मीरा लाड या करीत आहेत. या तपासात डॉ. शेवगणच्या रुग्‍णालयात चालत असलेल्‍या प्रकाराबाबत सुरज राणाने माहिती दिली. डॉ. सुरज याच्या रुग्‍णालयात गर्भनिदान चाचणी करण्यात येत असे व चाचण्या करण्यात आलेले गर्भपात शेवगण हिच्या रुग्‍णालयात करण्यात येत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेवगणच्या रुग्‍णालयावर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

याच प्रकरणी राणासह त्याचा चालक गणेश गोडसे, गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेचे नातेवाईक कारभारी जगन्नाथ हिवाळे, ज्ञानेश्‍वर सांडू लोंढे, राहुल गोरे अशा पाच जणांना अटक केली होती. ते सर्वजण सध्या हर्सूल कारागृहात आहेत.

‘त्या’ तिघांना आज हजर करणार

राणाच्या कबुलीवरून पोलिसांनी डॉ. सुनील बाळासाहेब पोते (57, रा. सिडको), डॉ. नईमोद्दीन रफिक शेख (48, रा. अंबड, जि. जालना, ह. मु. रोषणगेट) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र काशीनाथ सावंत (35, रा. मयूर पार्क, हर्सूल) यांना अटक केली. ते 25 हजार रुपयांत गर्भपात करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले.