‘गोंधळ’ थांबवण्यास सांगताच ‘फौजदारा’ची पकडली ‘कॉलर’, ‘पोलीस’ कर्मचाऱ्यांनाही केली ‘शिवीगाळ’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या फौजदाराची एकाने कॉलर पकडून सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (दि.14) मध्यरात्री बजाजनगरमध्ये घडली. याप्रकरणी महेश पाटील (रा. तारांगण सोसायटी, बजाजनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगरमधील मोहटादेवी चौकात मंगळवारी मध्यरात्री दोघेजण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच फौजदार राजेंद्र बांगर, पोलीस कॉन्स्टेबल शेख फहीम, शंकर बारवाल, पंकज साळवे हे रात्री एकच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. महेश पाटील याच्याकडे बांगर हे चौकशी करत असताना त्याने तुम्ही एक मिनिटात येथून निघुन जा, मी येथेच थांबणार असून तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत पोलिसांच्या अंगावर धावून गेला.

फौजदार बांगर हे महेश पाटील याला समजावून सांगत असताना त्याने बांगर यांची कॉलर पकडली. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच तुच काय हे पोलीस स्टेशन माझे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ करत मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. बांगर यांना तूच मोबाईल फोडला असे म्हणत त्यांच्यासोबत वाद घातला. तसेच गाडीतील 50 हजार रुपये आणि गळ्यातील सात तोळ्याची चैन तुम्ही काढली असे म्हणत केस करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फौजदार बांगर यांनी तक्रार दिली असून आरोपी महेश पाटील याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/