औरंगाबादचे नाव कधीही संभाजीनगर होऊ शकते : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद,पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच औरंगाबादकरांना सरप्राईज देणार आहेत आणि कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव संभाजीनगर होऊ शकते असे विधान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना खैरे यांनी ही माहिती दिली आहे.

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्याकडून औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा हायजॅक केला जातोय का ? असे खैरे यांना विचारल्यावर त्यांनी मुद्दा टिकवला पाहिजे असे चंद्रकांत खैरे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे की, आम्ही हिंदुत्व कायम ठेवलेले आहे. यावेळी बोलताना खैरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा १९८८ मध्ये पहिल्यांदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याचे देखील सांगितले.

ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी विधानसभेवर भगवा फडकवला त्याप्रमाणे औरंगाबादचे संभाजीनगर नाव करणे हे बाळासाहेबांचे स्वप्न देखील ते कोणत्याही क्षणी पूर्ण करतील आणि औरंगाबादकरांना सरप्राइझ देतील असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसबाबत माहिती नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस देखील या निर्णयाला विरोध करणार नाहीत असे देखील खैरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत नुकतेच त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्याने अनेक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणूनच शिवसेनेचे अनेक मुद्दे राज ठाकरे यांच्याकडून आगामी महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन टार्गेट केलं जात असल्याचे दिसून आले आहे.