काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात लातूरचा जवान सुरेश चित्ते शहीद

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू – काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावातील सुरेश गोरख चित्ते (वय-32) हे शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावत असताना हिमस्खनामध्ये चित्ते हे मृत्यूमुखी पडले. सुरेश चित्ते यांच्या निधनाची वार्ता गावात समजताच संपूर्ण गावावर आणि तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सुरेश चित्ते यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी, दोन मुली आणि महिन्याचा मुलगा आहे. सुरेश चित्ते हे 2014 मध्ये भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंट वन या तुकडीत सहभागी झाले होते. चित्ते यांच्या निधनाचे वृत्त समजताच आलमला गावात मकर संक्रांतीला भरवण्यात येणारी यात्रा आणि सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सुरेश चित्ते यांचे पार्थिव शुक्रवारी (दि.17) लातूरमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक अधिकारी ओंकार कापले यांनी दिली.

मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन जवानांचा तर पाच नागरिकांचा समावेश आहे. तसेच या घटनेनंतर अनेकजण बेपत्ता असून त्यामध्ये एका जवानाचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय ताबारेषेजवळ माछिल सेक्टरमध्ये हिमस्खलनात काही जवान अडकल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी शोध मोहीम राबवण्यात आली. अडकलेल्या जवानापैकी चार जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. तर गगनगीरी येथे झालेल्या हिमस्खलनात पाच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना सोमवारी रात्री उशीरा घडल्याचे वृत्त आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/