औरंगाबाद ते थेट चीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – ऐतिहासिक शहर आणि पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात चीनी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. प्रारंभीचे पाऊल म्हणून औरंगाबाद ते थेट चीन अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती चीनचे मंत्री बिलियन ली यांनी दिली. चीनचे उपराष्ट्रपती पुढील महिन्यात औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पाश्‍र्वभूमीवर चीनचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले असून त्यांनी महापालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी बिलियन ली बोलत होते.

चीनच्या या शिष्टमंडळाचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी  स्वागत केले. महापौरांसोबत चर्चा करताना मंत्री ली म्हणाले, की पर्यटन, व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. दोन्ही देशांदरम्यान ४७ विमानांच्या सेवा असून, विमानांची संख्या वाढवण्याचा मानस आहे. चीन ते ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या भारतामध्ये चीनचा ८४.४ मिलियन डॉलरचा व्यवसाय आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे. गेल्यावेळी २.४० मिलियन डॉलरचे बासमती तांदूळ, साखर, डाळ खरेदी करण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते जमीर कादरी, उपायुक्त मंजूषा मुथा, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, उद्यान अधीक्षक विजय पाटील, डी. पी. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. चीनच्या शिष्टमंडळामध्ये मंत्री बिलियन ली, हुंग गँग, यांग ताईनवेन, सॅन कॅन, झांग जिंस्किन, फॅन हाओनणं, वांग शिकाइ, टँगगुओ कोई यांचा समावेश होता.

चीनचे भारतामध्ये २४० उद्योग आहेत. त्यातील ४० कंपन्या महाराष्ट्रात आहेत. त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च शिक्षणासाठी दरवर्षी भारतातून २०,००० विद्यार्थी चीनमध्ये जातात तर चीनमधून २००० विद्यार्थी भारतात येतात. यामध्ये वाढ करण्यासाठी चीनकडून प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.