औरंगाबाद येथील दुर्घटनेनंतर पंतप्रधानांनी व्यक्त केली ‘हळहळ’

पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबादमधील करमाड रेल्वे रुळावर झोपलेल्या 16 कामगारांना चिरडले आहे. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेला हा रेल्वे अपघात व्यथित करणारा आहे. रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून, ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य दिले जात आहे, असे सांगितले आहे. आज सकाळी सव्वा पाचच्या सुमारास मालवाहू गाडी रुळावर झोपलेल्या कामगारांच्या अंगावरून गेली. सर्व प्रवासी मजूर छत्तीसगडमधील असून ते घरी चालत चालले होते. विश्रांती घेण्यासाठी ते रुळाजवळ थांबले होते, रुळावर झोपले असताना मालवाहू गाडीने त्यांना चिरडले. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातील कामगार परराज्यात अडकले होते. त्यांच्याकडून घरी जाण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.