डोळयांखाली काळी वर्तुळे आल्यानं वाढला तणाव, औरंगाबादमधील महिला डॉक्टरनं केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्याने तणावात असलेल्या एका 30 वर्षीय महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कांचनवाडी परिसरात मंगळवारी (दि. 20) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलीसांनी सुसाइड नोट जप्त केली असून त्यात त्यांनी माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डॉ. प्रियंका क्षीरसागर (वय 30) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचनवाडी परिसरातील ग्रँड कल्याण सोसायटीत क्षीरसागर कुटुंब राहते. डॉ. प्रियंका यांचे पती डॉ. प्रमोद क्षीरसागर घाटी रुग्णालयात डॉक्टर आहेत. डॉ. प्रमोद यांची परीक्षा सुरू असल्याने ते सकाळपर्यंत अभ्यास करीत होते. सकाळी 7 च्या सुमारास प्रियंका, मी आज जाणार आहे, असे सांगत एका खोलीत गेली अन् गळफास घेतला. मुलगा दाराजवळ रडत असल्याने प्रमोद यांनी घरात पाहिले तेंव्हा ती न दिसल्याने शोध सुरू केला. तेंव्हा पाठीमागील खोलीत तिने गळफास घेतल्याचे दिसले. डॉ. प्रमोद यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, प्रियंका या नगर जिल्ह्यातील असून प्रमोद यांच्याशी त्यांचा साडेचार वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.