रोहित शर्मासह टीम इंडियातील इतरांचा आणि स्टाफ सदस्यांचा Covid 19 रिपोर्ट आला, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय संघ वादात सापडला होता. त्याबाबत आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील खेळाडूंची ३ जानेवारीला मेलबर्नमध्ये कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्या सर्व खेळाडूंचे चाचणी अहवाल नकारात्मक आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

या चाचणी अहवालामुळे भारतीय संघाचा सिडनीच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ८ विकेट्सनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासोबत संघातील अन्य पाच खेळाडूंनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक हॉटेलमध्ये जेवण करुन कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा होती. त्यानंतर ३ जानेवारीला भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. ती नकारात्मक आल्याची माहिती, एनआयने बीसीसीआयचा हवाला देत दिली आहे.

तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच !

दरम्यान, कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढावल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यांनी दिले होते. मात्र तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनला होणार असल्याची ग्वाही सूत्रांनी दिली आहे. तर क्वीन्सलंड राज्य सरकारने खेळायला येणाऱ्या खेळाडूंना सर्व सामन्यांप्रमाणे नियमाचे पालन करावे लागेल, असे सुनावले आहे.