‘ड्रॅगन’सोबतच्या वादादरम्यान ऑस्ट्रेलियावर सर्वात मोठा सायबर हल्ला, चीनवर संशयाची सुई

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी सांगितले की, ऑस्ट्रेलिया एका मोठ्या सायबर हल्ल्याचा बळी ठरला आहे. या हल्ल्यात ऑस्ट्रेलियाच्या अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांच्या संकेतस्थळ व डेटाला लक्ष्य केले आहे. आता ऑस्ट्रेलियन सरकार आणि गुप्तचर यंत्रणा त्याचा तपासात गुंतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारी सायबर हल्ला झाला, प्राथमिक तपासणीत एका परदेशी एजन्सीला यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या देशातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे, आणि म्हंटले की, डिजिटल पद्धतीने काहीही करतांना सावधगिरी बाळगायला हवी.

पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले की, देशातील सरकारी, खासगी, राजकीय, आर्थिक, शिक्षण आणि आरोग्यासह सर्व प्रमुख क्षेत्रांवर सायबर हल्ला झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रयत्न केले जात होते, परंतु गेल्या काही दिवसांत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने आता यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, ते हे कसे टाळता येतील हे सर्वांना सांगितले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात सतत शाब्दिक लढाई सुरू आहे, ऑस्ट्रेलिया कोरोना संकट, बनावट वस्तू आणि बर्‍याच मुद्द्यांबाबत चीनवर सतत प्रश्न विचारत आहे. या दरम्यान, ऑस्ट्रेलियावर सायबर हल्ला झाला आहे, या हल्ल्यामागील देश आणि जगाच्या अनेक तज्ज्ञांनी चीनकडे लक्ष वेधले आहे. यापूर्वी झालेल्या वादामुळे ऑस्ट्रेलियाने चीनसंदर्भात कठोर निर्णय घेतले होते, त्यामध्ये गोमांस निर्यातीवरील बंदी, टॅरिफ वाढविण्यासोबतच तेथील नागरिकांना सावध करणे यांचा समावेश आहे. यापूर्वी अमेरिकेने अनेकदा चीनवर सायबर हल्ल्याचा आरोप केला होता, तर प्रत्येक वेळी चीनने हे आरोप फेटाळून लावले आहेत.