‘या’ देशात मतदान न केल्यास भरावा लागतो ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात लोकसभा निवडणूक प्रकियेत आता फक्त अंतिम टप्पा बाकी आहे. रविवार (१९ मे) रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. भारतात या निवडणुकांच्या बाबतीत मतदारांमध्ये उदासीनता दिसून येते. ५० टक्के देखील मतदान आपल्या इथे पार पडत नाही. मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस समजून आपल्याइथे नागरिक फिरायला जातात. मात्र जगाच्या पाठीवर असा देखील एक देश आहे जो तेथील नागरिकांनी मतदान न केल्यास त्यांच्याकडून दंड घेतो. हा देश आहे ‘ऑस्ट्रेलिया’. भारतात लोकसभा निवडणुका पार पडत असतानाच ऑस्ट्रेलियात देखील आज पंतप्रधानपदासाठी निवडणूक पार पडत आहे. या मतदानासाठी ऑस्ट्रेलियात जवळजवळ १ कोटी ६५ अधिकृत मतदार आहेत.

आज सकाळी ८ वाजता सुरू झालेलं मतदान हे आज संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. या निवडणुकीचा निकाल हा तात्काळ जाहीर केला जाणार आहे. आज रात्री उशिरापर्यंत संपूर्ण निकाल देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात दर तीन वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका पार पडत असतात. २००७ पासून येथील कोणत्याही पंतप्रधानाने आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. ऑस्ट्रेलियात मतदान करणे प्रत्येक मतदाराला बंधनकारक आहे. जर तुम्ही मतदान नाही केले तर तुम्हाला जवळपास १००० रुपये दंड म्हणून भरावा लागतो.

ज्याप्रकारे तेथील नागरिकांकडून दंड वसूल केला जातो, त्याप्रमाणे तेथील नागरिकांना सुविधा देखील सरकार पुरवीत असते. जे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी देखील विशेष सोय करण्यात आलेली असते. या नियमांमुळे तेथील प्रत्येक निवडणुकीत मतदान हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त होत असते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भारतात देखील अशीच एक अफवा पसरवली जात होती कि, तुम्ही मतदान न केल्यास तुमच्या खात्यातून विशिष्ट रक्कम वजा केली जाणार आहे.