‘या’ स्पर्धेत रंगणार भारत अन् पाकिस्तानचा क्रिकेटचा ‘सामना’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   आता तब्बल 24 वर्षांनी बर्मिंगहॅम येथे होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा एकदा क्रिकेटचे कमबॅक होत आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणा-या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (दि. 26) पात्र ठरलेल्या 6 संघांची घोषणा केली आहे. यात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आदीनी या स्पर्धेचे तिकिट पक्क केले आहे. तर यजमान म्हणून इंग्लंडचा संघ यापूर्वीच पात्र ठरला आहे. स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रकुल स्पर्धा खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा महिला क्रिकेटचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे.

यापूर्वी 1998 च्या मलेशियात ( क्वालालम्पूर ) राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांचे वन डे सामने खेळवले होते. त्यात भारतासह 12 देशांनी सहभाग घेतला होता. यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. यंदा महिला क्रिकेटचा समावेश राष्ट्रकुल स्पर्धेत केला आहे. 8 संघांमध्ये ट्वेंटी- 20 सामने खेळवले जाणार आहेत. आयसीसीच्या महिला ट्वेंटी-20 टीम गुणतालिकेनुसार अव्वल 6 संघांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे. वेस्ट इंडिज विभागातून संघ पात्रता फेरीतून उर्वरित दोन संघ प्रवेश करतील. राष्ट्रकुल स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ खेळणार नाही, कारण कॅरेबिनय देशांतून प्रत्येक संघ येथे सहभागी होत असतो. त्यामुळे फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ खेळतो. याबाबत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवेश निश्चित केल्याचा आनंद आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या आसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही प्रवेश केला होता आणि तोच आत्मविश्वास पुढे नेत आम्ही राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे तिने यावेळी सांगितले.