सकाळचा नाश्ता बनवायला जात होती महिला, तेवढ्यातच टोस्टरच्या मागून निघाला ‘काळा साप’ आणि नंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साप दिसणे हा बर्‍याच लोकांसाठी एक अतिशय धडकी भरवणारा अनुभव असतो. अशा परिस्थितीत जर आपल्या घरातील खोलीत, बाथरूम किंवा स्वयंपाकघराच्या कोणत्याही भागात साप आला तर ती एक अतिशय धोकादायक बाब ठरते. एका महिलेसोबत असेच काहीसे घडले. ही महिला सकाळी नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली होती. त्याच वेळी स्वयंपाकघरात ठेवलेल्या टोस्टरच्या मागून एक लांब काळा साप बाहेर आला. विशेष म्हणजे हा एक साधारण साप नसून जगातील विषारी सापांमध्ये याची गणना केली जाते.

वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण ऑस्ट्रेलियातील आहे. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनपासून 30 किलोमीटर अंतरावर माउंट नेबो नावाच्या ठिकाणी असलेल्या एका घरात हा प्रकार घडला. सकाळच्या व्यायामानंतर महिला घरी परतली होती आणि नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेव्हाच टोस्टरच्या मागून साप निघाला. काळ्या रंगाच्या या सापाला ‘रेड बेलीड’ म्हणतात आणि तो अत्यंत विषारी असतो.

महिला जॉगिंगसाठी गेली होती, तेव्हाच साप घरात शिरला

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये उष्णतेचे वातावरण आहे. तेथे उष्णता दररोज वाढतच आहे आणि अशा परिस्थितीत सापांचे बाहेर निघणे हे सामान्य झाले आहे. तथापि, घरात साप कसा गेला याबद्दल काहीही स्पष्ट झालेले नाही. असे मानले जात आहे की, जॉगिंगसाठी बाहेर जात असताना महिलेने चुकून घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. यादरम्यान, वाढती उष्णता पाहता हा साप एक थंड जागा शोधत असेल आणि तो घरात शिरला असेल.

महिलेच्या घरात शिरलेल्या सापाचे फोटो ब्रिस्बेन नॉर्थ स्नॅक कॅचर्स आणि रीलोकेशन सर्व्हिसने फेसबुकवर टाकले आहेत. ही महिला टोस्टर उघडण्याच्या तयारीत असतानाच, त्यामागे असणाऱ्या सापाचे डोके दिसले. त्यानंतर साप पकडणाऱ्यांना बोलविण्यात आले. हा साप 80 सेमी लांबीचा होता आणि शेवटी साप पकडणाऱ्याने त्याला पकडले.

साप पकडणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते बहुतेकदा उन्हाळ्यात थंड जागा शोधत असतात आणि म्हणूनच कधी कधी ते चुकून घराच्या आत जातात. साप पकडणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या घरात जो साप सापडला तो वर चढण्यास फारसा तरबेज नसतो. तथापि, स्वयंपाकघरात बनवलेल्या सेल्फच्या मदतीने तो वर चढला असावा. अधिक माहिती म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ‘रेड बेलीड’ साप आढळणे ही खूप सामान्य बाब आहे, कारण ते बर्‍याचदा अनेक ठिकाणी दिसत असतात. ते बरेच विषारी असतात परंतु, ऑस्ट्रेलियात या सापांमुळे कोणाच्या मृत्यूची घटना अद्याप नोंदविण्यात आल्याची माहिती उपलब्ध नाही.

You might also like