Pat Cummins : भारताच्या मदतीसाठी पुढे आला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज, PM केयर्स फंडमध्ये डोनेट केले ‘इतके’ लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात यावेळी कोरोनाचा कहर सुरू आहे. संपूर्ण देशात हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनची टंचाई निर्माण झाली आहे. कोरोनाने संक्रमित लोक ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमावत आहेत. ही परिस्थिती पाहून आस्ट्रेलिया आणि कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने भारतीय हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी ‘पीएम केयर्स फंड’मध्ये 50000 डॉलर ( सुमारे 37 लाख रुपये) डोनेट करण्याची घोषणा केली आहे. त्याने घोषणेसोबतच भारतीय लोकांसाठी एक प्रेमळ संदेश सुद्धा ट्विटरवर शेयर केला आहे.

ट्विटमध्ये कमिंसने लिहिला प्रेमळ संदेश
पॅट कमिंसने ट्विटरवर एक नोट शेयर करून लिहिले आहे की, भारत एक असा देश आहे, ज्याच्यावर मी अनेक वर्षांपासून प्रेम करत आलो आहे. येथील लोक सर्वात जास्त उत्साहाने भेटतात. यावेळी लोक खुप अडचणीतून जात आहेत आणि हे समजल्यावर खुप दु:ख झाले. यावर खुप चर्चा झाली आहे की, कोविडच्या काळात आयपीएल सुरू ठेवणे योग्य आहे का. मला सांगण्यात आले की, भारत सरकारचे म्हणणे आहे की, कोरोना आणि लॉकडाऊनच्या या अवघड काळात आयपीएल लोकांचे मनोरंजनाचे साधन बनत आहे.

कमिंसने पुढे म्हटले आहे की, खेळाडूंच्या रूपात आम्हाला एक असा मंच मिळाला आहे, ज्यामध्ये आम्ही लाखो लोकांपर्यंत सहज पोहचू शकतो. या मंचाचा वापर आम्ही चांगल्या कामासाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन मी विशेष करून भारतात हॉस्पिटलमध्ये ऑक्स्जिनच्या पुरवठ्यासाठी पीएम केयर्स फंडमध्ये योगदान दिले आहे. मी माझ्या आयपीएल सहकार्‍यांना योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.